– गडचिरोलीत अत्याधुनिक संगणकीकृत भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ४ : आता गडचिरोलीतील नागरिकांना जमिनीशी संबंधित सर्व शासकीय दस्तऐवज मिळविणे अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात सेतु केंद्राच्या धर्तीवर अत्याधुनिक संगणकीकृत भू-प्रणाम केंद्र उभारण्यात आले असून, याचे उद्घाटन आज निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या केंद्रात नागरिकांना सातबारा उतारा, मिळकत पत्रिका, रंगीत नकाशे, तसेच अन्य आवश्यक अभिलेख केवळ शासकीय शुल्क भरून सहज उपलब्ध होणार आहेत. विविध कार्यालयांमध्ये फिरण्याची गरज आता टळणार असून, सेवांमध्ये पारदर्शकता आणि गती येणार आहे.
“ही सुविधा म्हणजे नागरिकांसाठी जलद आणि प्रभावी सेवा पुरविण्याचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असे मत सूर्यवंशी यांनी यावेळी व्यक्त केले.
उद्घाटन प्रसंगी चुरमुरा येथील मनोहर नानाजी राऊत व रत्नमाला पत्रु लोणारे यांना स्वामित्व योजनेअंतर्गत प्रतीकात्मक रूपाने सनद प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला अधिक्षक भूमी अभिलेख श्रीमती नंदा आंबेकर, उपअधिक्षक योगेश कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही सुविधा म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा असून, डिजिटल युगातील एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.














