– प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : पत्नीचा क्रूरपणे खून केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक आर. जोशी यांनी हा न्याय दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा तालुक्यातील जपतलाई (कोवानटोला), येथील परसराम धानुजी कुमरे (वय ४८) हा सतत पत्नी मिराबाई (वय ३७) हिच्या चारीत्र्यावर संशय घेत असे. त्यातून ४ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री एका वादाच्या दरम्यान त्याने लोखंडी मुसळ व चाकूने वार करून तिचा खून केला. घटनेनंतर परसरामची बहिण आशाबाई पोटावी हिने धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलीस मदत केंद्र, येरकड चे पोलीस उपनिरीक्षक आकाश ठाकरे यांनी तपास करत आरोपीस अटक केली. त्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान फिर्यादी, पंच, साक्षीदारांचे बयान व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले.
दरम्यान न्यायालयाने परसराम कुमरेस आयुष्यभराची कैद (जन्मठेप) व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिने वाढीव कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
सरकारी पक्षाचे काम सहायक जिल्हा सरकारी वकिल सचिन कुंभारे यांनी पाहिले. प्रकरणातील पैरवीसाठी पोनि चंद्रकांत वाबळे, श्रेणी पोउनि शंकर चौधरी, श्रेणी पोउनि भैयाजी जंगटे, मपोहवा जिजा कुसनाके, मपोहवा मिनाक्षी पोरेड्डीवार, पोशि जिवन कुमरे व मपोशि छाया शेट्टीवार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #न्यायालय #पत्नीचाखून #जन्मठेप #CourtVerdict #MurderCase #CrimeNews #LawAndOrder #Maharashtra #Gadchiroli













