गडचिरोली : गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधासाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम
– १४ वर्षांच्या मुलींना मिळणार मोफत सुरक्षा कवच
The गडविश्व
गडचिरोली, दि. ५ : महिलांमधील गंभीर आजार असलेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर (Cervical Cancer) प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह गडचिरोली जिल्ह्यात ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केली आहेत, मात्र १५ वर्षे पूर्ण केलेली नाहीत, अशा सर्व मुलींना ही लस शासकीय आरोग्य संस्थांमध्ये पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या गंभीर आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
याबाबत माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, गर्भाशय मुखाचा कर्करोग हा टाळता येण्यासारखा आजार असून योग्य वयात दिलेली एचपीव्ही लस मुलींच्या भविष्यातील आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून सर्व शासकीय आरोग्य केंद्रांवर मोफत उपलब्ध आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनीही पालकांना आवाहन करताना सांगितले की, मुलींचे भविष्य सुरक्षित आणि आरोग्यदायी करण्यासाठी ही लस अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाकडून लसीकरणासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी सांगितले की, एचपीव्ही लस ही नवीन नसून जगभरात ५० कोटींहून अधिक महिलांनी ती घेतली आहे. ही लस ९३ ते १०० टक्के प्रभावी असून पालकांनी आपल्या मुलींची ‘U-WIN’ पोर्टलवर https://uwin.mohfw.gov.in/home
नोंदणी करून जवळच्या आरोग्य केंद्रात लसीकरण करून घ्यावे. लसीच्या दुष्परिणामांबाबत काही पालकांमध्ये गैरसमज आहेत, मात्र इतर लसींप्रमाणेच इंजेक्शनच्या जागी थोडे दुखणे किंवा हलका ताप येणे यासारखे किरकोळ दुष्परिणाम दिसू शकतात आणि ते २ ते ३ दिवसांत कमी होतात. या लसीमुळे भविष्यात प्रजनन क्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले की, महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा गंभीर आजार असून नियमित तपासणी आणि वेळीच लसीकरण केल्यास या आजाराचा व त्यातून होणाऱ्या मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
या मोहिमेअंतर्गत १४ वर्षे पूर्ण परंतु १५ वर्षांखालील मुली पात्र असून त्यांना सर्व शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी ‘U-WIN’ पोर्टलवर नोंदणी करता येईल किंवा जवळच्या आशा स्वयंसेविका व एएनएम यांच्याशी संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी आरोग्य विभागाने टोल फ्री क्रमांक १०४ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून डॉ. माधव शिंदे (जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी) व डॉ. प्रफुल हुलके (वैद्यकीय अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण केंद्र) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सविस्तर प्रशिक्षण दूरभाष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice













