विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज गडचिरोली जिल्हा बंद

118

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज गडचिरोली जिल्हा बंद
– शाळा-महाविद्यालये, व्यापारी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. 23 : दिल्लीतील जंतरमंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत आज (दि. 23 जुलै) गडचिरोली जिल्हा बंद पाळण्यात येणार आहे. हा बंद शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने पाळण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, या बंदमध्ये वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), आजाद समाज पार्टी, बीआरएसपी, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष तसेच विविध विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी जिल्ह्यातील व्यापारी, सामाजिक संस्था, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुके आणि ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीच्या या आंदोलनात सहभागी होण्याचेही आवाहन आयोजकांनी केले आहे.
विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई ही लोकशाही मूल्यांना धक्का देणारी असून सरकारची असंवेदनशील भूमिका दर्शविणारी असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. देशाचे भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे लाठीचार्ज होणे अत्यंत निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गडचिरोली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बंद शांततापूर्ण, संविधानिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पाळण्यात येणार असल्याचे सांगत सर्व नागरिकांनी सहकार्य करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here