गडचिरोली : स्मशानभूमीवरून हाणामारी, मृतदेह शेजारी ठेवून दोन गट आमनेसामने

55

गडचिरोली : स्मशानभूमीवरून हाणामारी, मृतदेह शेजारी ठेवून दोन गट आमनेसामने
– ११ जणांवर गुन्हा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे रविवारी स्मशानभूमीच्या जागेवरून उसळलेल्या वादाने अक्षरशः रणांगणाचे स्वरूप घेतले. अंत्यसंस्कारासाठी आणलेला मृतदेह शेजारी ठेवूनच दोन गट लाठ्याकाठ्यांसह भिडले. यात काहीजण जखमी झाले असून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून ११ जणांवर गुन्हा नोंदवला आणि चौघांना अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ग्रामस्थ गेली अनेक वर्षे या स्मशानभूमीचा वापर अंत्यसंस्कारासाठी करत होते. मात्र बाहेरगावाहून आलेल्या काही व्यक्तींनी जागेवर अतिक्रमण करून स्वतःचा दावा केल्याने वाद चिघळत होता. १४ सप्टेंबरला एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी अतिक्रमण करणाऱ्या गटाने आक्षेप घेतल्याने तणाव निर्माण झाला. पाहता पाहता दोन्ही गट आमनेसामने आले आणि मृतदेह शेजारी ठेवूनच हाणामारी झाली.
घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षल एकरे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले.
दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमा दोनवेळा राबवूनही अतिक्रमण कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या निष्क्रीय भूमिकेमुळे परिस्थिती बिघडत असल्याचा आरोप करण्यात येत असून या घटनेने ग्रामस्थांत तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here