The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : रस्त्यावर एस.टी. बस थांबवून चालकावर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि वीस हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांची वाढीव शिक्षा भोगावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम जखमी चालकास नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार आहे.
सदर घटना ९ मार्च २०१९ रोजी चामोर्शी–गोंडपिपरी मार्गावरील गणपूर येथे घडली. प्रविण तलांडे (एस.टी. चालक) बस चालवत असताना आरोपी सुनिल कोहपरे (रा. गणपूर) याने आपली मोटारसायकल रस्त्यात लावून बस अडवली. गाडी हटवण्यास सांगितल्यावर आरोपीने चालकाला शिवीगाळ करत कॉलर पकडला आणि चाकूने हल्ला केला. यामध्ये चालकाच्या मांडीवर गंभीर जखम झाली. प्रवाशांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी कलम 341, 324, 504, 506, 332, 353 भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. साक्षीदारांचे बयाण, पुरावे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायाधीश विनायक जोशी यांनी निकाल दिला.
सरकारी पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी युक्तिवाद केला. तपास परि. पोउपनि. दिनेशकुमार लिल्हारे यांनी तर कोर्ट कामकाजात पोनि. चंद्रकांत वाभळे, पोउपनि. शंकर चौधरी व सफौ. सागर मुल्लेवार यांनी सहभाग घेतला.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #gadchirolipolice