गडचिरोलीत घरगुती बाप्पाचा आगळा देखावा : “नक्षलमुक्त गडचिरोली – शांतता व विकासाचा संदेश”

841

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : गणेशोत्सव म्हटले की घराघरात नवनवीन सजावट आणि आकर्षक देखावे पाहायला मिळतात, मात्र गडचिरोलीतील अश्विनी सदाशिव देशमुख यांनी यंदा साकारलेला देखावा केवळ वेगळेपणासाठीच नव्हे, तर सामाजिक संदेशासाठीही विशेष चर्चेत आला आहे. देशमुख यांनी घरगुती बाप्पामार्फत नक्षलमुक्त व प्रगत गडचिरोलीचे स्वप्न साकार करत “हिंसाचार सोडा, विकासाचा मार्ग निवडा” हा प्रभावी संदेश दिला आहे.
या देखाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण स्वीकारताना दाखविले असून, त्यांच्या शेजारी जिल्हा पोलिस अधीक्षक व सुरक्षा रक्षक उभे आहेत. आत्मसमर्पणाच्या क्षणी मुख्यमंत्री आत्मसमर्पितांना भारतीय संविधानाची प्रत देत स्वागत करताना दर्शविण्यात आले असून, त्यातून लोकशाही आणि शांततेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. वर्दीतल्या बाप्पाच्या हातातील घोषवाक्य हे संपूर्ण देखाव्याचे मुख्य आकर्षण ठरले आहे, तर बाप्पाच्या पायाशी शस्त्र अर्पण करणारे नक्षली नव्या सुरुवातीचे प्रतीक ठरत आहेत.
गडचिरोली पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्यात होत असलेल्या सकारात्मक बदलांचे चित्रणही देखाव्यात प्रभावीपणे साकारले आहे. आधुनिक शेती करणारा शेतकरी, जिल्ह्यात पर्यटन विकासाला मिळणारी चालना, तब्बल ७५ वर्षांनंतर दुर्गम भागात पोहोचलेली एस.टी. बस, नव्याने उभे राहिलेले शाळा व आरोग्य केंद्र, तसेच ७९ वर्षांनंतर गावागावात पहिल्यांदा फडकलेला तिरंगा – ही दृश्ये गडचिरोलीच्या आशादायी भविष्यास उजाळा देतात.
गावच्या पारंपरिक जीवनाचेही दर्शन यात घडते.

एका महिलेने घरासमोर “विकासाची रांगोळी” काढतानाचे चित्रण देखाव्याला वास्तवतेची जोड देऊन जाते. त्यामुळे हा संपूर्ण देखावा फक्त धार्मिक न राहता, सामाजिक आणि राष्ट्रीय भान जागवणारा ठरतो.
अश्विनी देशमुख यांच्या या अभिनव उपक्रमामुळे घरगुती गणेशोत्सवात एक वेगळेच सांस्कृतिक व सामाजिक भान निर्माण झाले असून, गडचिरोलीकरांच्या स्वप्नातील शांतता, विकास आणि नक्षलमुक्त भविष्याचा सुंदर कलात्मक आराखडा या देखाव्यातून साकारला गेला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here