खरीपावर एल निनोचे सावट; पीक विमा घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
– पावसातील अनिश्चिततेमुळे उत्पादनावर परिणामाची शक्यता
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : यंदाच्या खरीप हंगामात एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर धानासह अन्य खरीप पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तातडीने सहभागी होऊन पिकांचे विमा संरक्षण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, एल निनोमुळे हवामानातील अनिश्चितता वाढून दुष्काळ, पावसातील खंड, पूर, भूस्खलन, वीज कोसळणे तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव यांसारख्या नैसर्गिक संकटांचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाचे संरक्षण कवच ठरत आहे.
या योजनेअंतर्गत पावसातील खंड, पूर, दुष्काळ, भूस्खलन, वीज कोसळणे तसेच कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक उत्पन्नाच्या आधारे नुकसानभरपाई दिली जाते. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
शेतकरी गावातील किंवा जवळील सामाईक सेवा केंद्र (सीएससी), संबंधित बँक शाखा, शासनाच्या अधिकृत PMFBY पोर्टल अथवा क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून पीक विम्यासाठी ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित गावाचे कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.













