दर्जेदार व सुरक्षित शाळा उभारणीसाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा पुढाकार
– कंपाऊंड वॉल, सिसिटिव्ही आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांना प्राधान्य
The गडविश्व
गडचिरोली दि.१३ : जिल्ह्यातील शाळांना दर्जेदार व सुरक्षित स्वरूप मिळावे यासाठी शिक्षण विभागाने ठोस पावले उचलावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. शाळा सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी कंपाऊंड वॉल, सिसिटिव्ही यंत्रणा, नवीन वर्गखोल्या, किचन शेड आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह या मूलभूत गरजांना प्राधान्य द्यावे असे सांगितले.
बैठकीत जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेसाठी आवश्यक निधी, नियोजन आणि धोरणात्मक बदलांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पावसाळी भागात शाळा व किचन शेडच्या बांधकामासाठी वेगळ्या तांत्रिक पद्धतींचा विचार करण्याची गरज असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. मंजूर निधीतून सुरू झालेली व प्रलंबित असलेली कामे, तसेच अडचणी यांचा त्यांनी आढावा घेतला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी लोकसहभागातून शाळांमध्ये सिसिटिव्ही बसविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार (प्राथमिक), वासुदेव भुसे (माध्यमिक), समग्रचे कार्यकारी अभियंता रविंद्र भरडकर, प्रशांत ढोंगे, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर आदी अधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













