देसाईगंज : आयपीएलवर ऑनलाईन जुगार, पोलीसांनी दोघांच्या आवळल्या मुसक्या

1676

– सात लाख अकरा हजारांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, ११ मे : शहरात आयपीएलवर ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यांच्या देसाईगंज पोलिसांनी मुसक्या आवळत तब्बल ७ लाख ११ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई १० मे रोजी केली. या प्रकरणी क्रमांक ०१५५ / २०२३ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ व कलम १०९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करुन कमलेश मुरलीधर कुमरे (२८) , रा. शिवाजी वार्ड देसाईगंज ता. देसाईगंज जिल्हा गडचिरोली, अक्षय रमेश मेश्राम (२७) रा. गांधी वार्ड देसाईगंज ता. देसाईगंज जिल्हा गडचिरोली यास अटक करण्यात आली असुन यातील २ आरोपी फरार आहेत.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालून कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे / उपपोस्टे व पोमके यांना दिलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर १० मे २०२३ रोजी पोस्टे देसाईगंज येथे मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारावर कुथे पाटील हायस्कुल देसाईगंज समोर जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी काही ईसम चेन्नई विरुध्द दिल्ली या आयपीएल क्रिकेट सामन्यावरती अवैध वेबसाईटच्या माध्यमातून सट्टा (जुगार / बेटींग) खेळत असल्याचे मिळून आले. दरम्यान त्यातील एकास ताब्यात घेऊन विचारपूस करुन मोक्यावर झडती घेतली असता सदर वेबसाईटची लिंक, युजर आयडी आणि पासवर्ड इत्यादी अक्षय रमेश मेश्राम रा. गांधी वार्ड देसाईगंज या व्यक्तीने दिली असुन त्या वेबसाईटच्या माध्यमातून मी अवैध सट्टा लावत असल्याचे सांगितले. तसेच अक्षय मेश्राम हा शहरातील अनेक तरुणांना आयपीएलवर सट्टा (जुगार / बेटींग ) लावण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड तयार करून देऊन सट्टाबाजी करण्यास उत्तेजित करीत असल्याचे सांगितल्याने पोलीस स्टॉफसह शहरात त्याचा शोध घेऊन पाठलाग केले असता लांखादूर टि पाईंट जवळ रोडच्या बाजूला हयुडाई क्रेटा वाहन क्र. एमएच ४० एआर ९३६३ अंदाजे किंमत ६,५०,०००/- रुपयाच्या वाहनामध्ये आत बसुन अवैधरित्या आयपीएलवर सट्टाबाजी करीत असताना आढळून आला. त्याचवेळी त्याची व वाहनाची झडती घेतली असता जुन्या वापरत्या अँपल, सॅमसंग, रेडमी कंपनीचे मोबाईल फोन, विविध बँकेचे एटीएम कार्ड, काही पर्सनल कागदपत्र, आकडेवारीचे चिठ्ठी व काही रोख रक्कम असे मिळून अंदाजे एकुण ७,११,६२०/- रुपयांचा मुद्देमाल कारवाई करुन जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर सा., यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि युनुस इनामदार, निलेश ठाकरे, पोलीस अंमलदार कुमोटी, ढोके व जांभुळकर यांनी केली असुन पुढील तपास पोउपनि युनुस इनामदार हे करीत आहेत. यावेळी संपूर्ण जिल्हयातील नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध सट्टेबाजी पासुन दूर राहून जर कोणी असे अवैध व्यवसाय चालवित असतील त्यांची माहीती पोलीस विभागाला देण्याचे आवाहन मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली यांनी केले आहे.

(the gdv, the gadvishva, ipl jugar, desaiganj, gadchiroli news updates, crime news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here