‘निधी नाही’ म्हणणाऱ्या नगर पंचायतीला नागरिकांची ‘भीक’; कुरखेड्यात अनोख्या आंदोलनातून प्रशासनाला दणका

97

‘निधी नाही’ म्हणणाऱ्या नगर पंचायतीला नागरिकांची ‘भीक’; कुरखेड्यात अनोख्या आंदोलनातून प्रशासनाला दणका
– जमा झालेली रक्कम सोमवारी मुख्याधिकाऱ्यांकडे सुपूर्द, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. २६ : मूलभूत नागरी सुविधांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही नगर पंचायत प्रशासनाकडून “निधी नाही” हेच कारण पुढे केले जात असल्याच्या निषेधार्थ कुरखेडावासीयांनी शनिवारी अनोखे आंदोलन छेडले. कुरखेडा कृती समितीच्या नेतृत्वाखाली शहरात ‘भिकमांगो आंदोलन’ राबवून नागरिकांनी प्रत्यक्ष भीक मागत निधी जमा केला आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
फवारा चौकातून सुरू झालेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. मार्गावरील व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत देत आंदोलनाला प्रतिसाद दिला. जमा झालेली रक्कम सोमवारी नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
कृती समितीने नगर पंचायतसमोर अनेक मूलभूत मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये बंद पडलेली रुग्णवाहिका तातडीने दुरुस्त करणे, शीतपेटी उपलब्ध करून देणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करणे, दोन वर्षांपासून बंद असलेले वॉटर एटीएम सुरू करून शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारणे, अपूर्ण समाजभवनाचे काम पूर्ण करणे, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करणे तसेच आठवडी बाजारातील विविध समस्यांचे निराकरण करणे, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
प्रशासनाने यानंतरही दुर्लक्ष केल्यास अधिक तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा कुरखेडा कृती समितीचे अध्यक्ष दीपक धारगाये आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. नागरिकांच्या या अनोख्या आंदोलनाची शहरात सर्वत्र चर्चा होत असून, नगर पंचायत प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here