–मुरूमगाव गाव संघटनेच्या निवेदनाची दखल
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथे गावाच्या निर्णयाचे उल्लंघन करून अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दारुबंदी समितीने पोलिस मदत केंद्राकडे निवेदनाद्वारे केली. याबाबतची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.
मुरूमगाव येथील दारूविक्री बंदीसाठी दारुबंदी समिती व ग्रामस्थांनी प्रयत्न करून ग्रामसभेच्या माध्यमातून दारू विक्री बंद केली होती. परंतु गावातील काही मुजोर विक्रेत्यांनी पुन्हा अवैध दारूविक्री सुरू करून निर्णयाचे उल्लंघन केले. याबाबतची माहिती मिळताच समितीने बैठकीचे आयोजन करून पोलिस विभागाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातील पोलिस पाटील, सरपंच, गाव संघटनेच्या महिलांनी संयुक्तरित्या मुरूमगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक एम एम. शिरसाट यांना निवेदन सादर करून त्यांच्यापुढे अवैध दारूविक्री संदर्भातील परिस्थिती मांडली व विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करून आमच्या गावाला दारूविक्रीच्या समस्येतून मुक्त करण्याची विनंती केली. यावेळी पोलिस उपनिरक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
निवेदनाची दखल घेत पोलिस मदत केंद्रातील पथकाने गावातील चार दारू विक्रेत्यांच्या घरी धाड टाकून तपासणी केली व पुन्हा अवैध दारूविक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे ठणकावून सांगितले. यावेळी गावातील पोलीस पाटील चंदू ओरमडिया, पोलीस हवालदार कृष्णा उसेंडी , रामचंद्र सिद्राम, सुधाकर नरोटे, पोलीस शिपाई निकेश मडकाम, वाल्मीक कोटांगले, दिनेश मोंढरे, पोलीस शिपाई सुजाता पडोळे, मुक्तीपथचे उपसंघटक भास्कर कड्यामी, स्पार्क कार्यकर्ता जीवन दहिकर, प्रभारी संघटक रेवनाथ मेश्राम, स्पार्क कार्यकर्ती बुधाबाई पोरटे, दारूबंदी गाव संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )