गडचिरोली-चिमुर मतदारसंघात सायंकाळी ५ वाजतापर्यंत सरासरी ६५.१९ टक्के मतदान

569

-मतदानाची अंतिम टक्केवारी उद्यापर्यात स्पष्ट होणार
The गडविश्व
गडचिरोली, दि,१९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 65.19 टक्के मतदान झाले होते. अंतिम आकडेवारी दुर्गम भागातील पथके परत आल्यावर स्पष्ट होणार आहे.
मतदार संघात आज सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी दिसून येत होते. शहरी व ग्रामीण भागत मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कुरखेडा येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे लक्षात येताच तातडीने मतदान यंत्र बदलवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. प्रशासनामार्फत मतदारांसाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मतदान केंद्रांवर करण्यात आल्या होत्या. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांचे निवडणूक प्रक्रियेवर चोख लक्ष होते. त्यांनी विविध मतदान केंद्रावर भेटी देवून मतदारांकडून मतदान सुविधेबाबत प्रतिक्रीया जाणून घेतल्या. रांगेत असलेल्या महिलांना मतदानासाठी प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केंद्राध्यक्ष यांना दिल्या.

विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1891 मतदान केंद्रावर मतदान प्रकिया पार पडली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातील

आमगाव विधानसभा मतदारसंघात 64.60 टक्के
आरमोरी 65.23 टक्के
गडचिरोली 66.10 टक्के
अहेरी 63.40 टक्के
ब्रम्हपुरी 67.02 टक्के आणि
चिमुर 64.49 टक्के मतदारांनी
मतदानाचा हक्क बजावला, असल्याची अंदाजीत आकडेवारी निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी दिली आहे. दुर्गम भागातील मतदान पथके परत आल्यावर तेथील आकडेवारी उशीरापर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यानंतरच अंतिम आकडेवारी स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाकडून मतदांना प्रोत्साहन

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते. दैने यांचे वडीलांचे 15 एप्रिल रोजी दु:खद निधन झाल्यावर त्यांचे अंतिम संस्कार कार्य उरकून जिल्हाधिकारी दैने 17 एप्रिल रोजी तातडीने निवडणूकिच्या राष्ट्रीय कर्तव्यावर हजर झाले होते. त्यांनी आज गडचिरोली येथे मतदान करून मतदानाचे कर्तव्य पार पाडून वडिलांना श्रद्धांजली वाहत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल यांनीही मतदारांना निर्भिडपणे मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांनीही आज सहपरिवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपालिकेच्या शाळेत मतदान केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी गोंडी भाषेतुन आवाहन करत ग्रामिण मतदारांना मतदान करण्याचा संदेश दिला होता. त्यांनी शहरातील पंचायत समिती येथील महिला संचालित पिंक मतदान केंद्रावर भेट देवून महिला मतदारांचा उत्साह वाढविला. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी अहेरी उपविभागातील दुर्गम भागातील मतदारांशी संवाद साधला. समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन मडावी यांनी महिला नवमतदार व अपंग मतदारांची रथातून वाजत गाजत मिरवणूक काढून एक आगळा उपक्रम राबविला. याशिवाय जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी महत्वपुर्ण योगदान दिले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolilocalnews #gadchirolinews #gadchirolipolice #loksabhaelection2024 )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here