श्रमदानातून सावंगा (बु.) येथे उभारला वनराई बंधारा

73

श्रमदानातून सावंगा (बु.) येथे उभारला वनराई बंधारा
– मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १५ : धानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत सावंगा (बु.) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत श्रमदान व लोकवर्गणीतून अनोख्या पद्धतीने वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. परिसरातील नाल्यावर रिकाम्या सिमेंट बॅगमध्ये रेती भरून पाणी अडवण्यासाठी भिंत उभारण्यात आली असून, भिंतीला लागून पॉलीथिनचा वापर करून पाणी अधिक काळ साठून राहावे यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे.
या उपक्रमात सेऊ उसेंडी, उपसरपंच सिद्धू गावडे, ग्रामकोष समिती अध्यक्ष, गाव भूमिया संतोष जांगी, गाव पाटील निरु नरोटे, ग्रामपंचायत अधिकारी भास्कर वडलकोंडा यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, शेतकरी वर्ग व समस्त ग्रामवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वनराई बंधाऱ्यामुळे साचलेले पाणी वन्यप्राणी, पाळीव जनावरे तसेच शेतीसाठी विशेषतः पाणीटंचाईच्या काळात उपयुक्त ठरणार आहे. जलसंधारणाच्या दृष्टीने हा उपक्रम गावासाठी लाभदायक ठरणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
दरम्यान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजने अंतर्गत संपूर्ण धानोरा तालुक्यात अभियान राबविण्यात येत असून, पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान दोन बंधारे श्रमदान व लोकवर्गणीतून उभारण्याचा संकल्प जवळपास पूर्णत्वाकडे येत असल्याची माहिती शांतीरक्षक वानखेडे यांनी दिली. या अभियानाला ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी वर्ग व ग्रामवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सामूहिक सहभागातून जलसंधारणाचा आदर्श निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here