नक्षलवाद्यांची लपवलेली शस्त्रे शोधा अन् रोख बक्षीस मिळवा; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
– शस्त्रांच्या प्रकारानुसार दीड लाख रुपयांपर्यंत बक्षीस; माहिती देणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यास राज्य सरकारची मान्यता
The गडविश्व
मुंबई, दि. १७ : नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेली आणि सध्या त्यांच्या ताब्यात असलेली शस्त्रे शोधण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना आता रोख बक्षीस दिले जाणार आहे. शस्त्रांच्या प्रकारानुसार सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
माओवादी चळवळीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत नक्षलवाद्यांनी विविध काळात पोलीस ठाण्यांवर तसेच सुरक्षा दलांच्या पथकांवर हल्ले करून मोठ्या प्रमाणात शस्त्रे लुटून नेली आहेत. ही शस्त्रे पुन्हा हस्तगत करण्यासाठी माहिती देणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची स्वतंत्र तरतूद नव्हती. त्यामुळे अशा शस्त्रांचा शोध घेऊन ती जप्त करण्यास मदत करणाऱ्यांना रोख बक्षीस देण्याचा प्रस्ताव गृह विभागाने मंत्रिमंडळासमोर सादर केला होता.
नव्या निर्णयानुसार, नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेली शस्त्रे तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या अन्य शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे. स्वयंचलित, अर्धस्वयंचलित आणि इतर प्रकारची शस्त्रे तसेच दारुगोळ्यासाठी स्वतंत्र बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली आहे. शस्त्रांच्या प्रकारानुसार ही रक्कम सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत असेल.
बक्षीस मंजुरीसाठीही आर्थिक मर्यादेनुसार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार, पोलीस अधीक्षकांना १० लाख रुपयांपर्यंत, गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षकांना २५ लाख रुपयांपर्यंत, तर २५ लाखांपेक्षा अधिक आणि ५० लाख रुपयांपर्यंतच्या बक्षिसांना मंजुरी देण्याचे अधिकार विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) यांना असतील. ५० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या बक्षीस रकमेच्या मंजुरीचे अधिकार अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) यांच्याकडे असतील.
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नक्षलवादाचा प्रभाव कमी झाला असून, रेड कॉरिडॉरच्या पश्चिम सीमेवरील गडचिरोली आणि गोंदिया हे जिल्हे नक्षलमुक्त झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांकडे असलेली लुटलेली शस्त्रे शोधून ती सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात आणण्यासाठी सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Naxalism #MaoistWeapons #MaharashtraCabinet #AntiNaxalOperation #MaharashtraGovernment #SecurityForces #NaxalFreeGadchiroli













