अतिदुर्गम मोरमेट्ट्यात अखेर वीजपुरवठा सुरळीत; पोलीस-महावितरणच्या संयुक्त प्रयत्नांना यश

6

अतिदुर्गम मोरमेट्ट्यात अखेर वीजपुरवठा सुरळीत; पोलीस-महावितरणच्या संयुक्त प्रयत्नांना यश
The गडविश्व
गडचिरोली, दि.१७ : भामरागड उपविभागातील अतिदुर्गम मोरमेट्टा गावात अखेर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. गडचिरोली पोलीस दल आणि महावितरण विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे १६ नोव्हेंबर रोजी गावात विद्युत सेवा पुन्हा सुरू झाली. त्यामुळे दीर्घकाळ मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नेलगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मोरमेट्टा गावात यापूर्वी वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि जंगल परिसरामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. त्यातच वीजखांब पडणे आणि तारांची जोडणी तुटल्याने वीजपुरवठा पूर्ववत करणे आव्हानात्मक बनले होते. ही अडचण लक्षात घेऊन गडचिरोली पोलीस दलाने महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर दोन्ही विभागांच्या समन्वयातून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले.
वीजपुरवठा सुरू झाल्याने गावातील नागरिकांना रात्रीच्या वेळी प्रकाशाची सुविधा मिळणार असून, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि दैनंदिन कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
नेलगुंडा पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यानंतर परिसरातील दुर्गम गावांमध्ये विकासकामांना गती मिळाली आहे. पोलीस दलाच्या सहकार्यातून बोगामी नाल्यावर पूल बांधण्यात आला असून, नेलगुंडा गावात सोलर लॅम्पही बसविण्यात आले आहेत. तसेच पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून महिला, आरोग्य, कृषी, आधार कार्ड आणि जनजागरण मेळाव्यांचे आयोजन करून जवळपास २,५०० नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
दरम्यान, गडचिरोली पोलीस दलाच्या संरक्षणात जिल्ह्यात ५६७ मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले असून, ४२४.२७ किलोमीटर लांबीचे रस्ते आणि ६५ पुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. दुर्गम भागातील दळणवळण आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोलीस दलाकडून विविध विभागांच्या समन्वयातून प्रयत्न सुरू आहेत.
मोरमेट्टा गावातील वीजपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन जीवनमानात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी व्यक्त केला.
हा उपक्रम पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी.जे. आणि सहायक पोलीस अधीक्षक सागर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेलगुंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजिंक्य इथापे, पोलीस उपनिरीक्षक राहुल जेंगठे, एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक मोराणकर, ग्रामसेवक मनमावरे, महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ राजू माहाका, मोरमेट्टा गावातील तरुण तसेच पोलीस आणि एसआरपीएफच्या जवानांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here