वैनगंगेच्या काठावर एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्याच्या संशयास्पद हत्येने खळबळ

13

वैनगंगेच्या काठावर एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्याच्या संशयास्पद हत्येने खळबळ
– बोंडरानी जंगलातील घटना, अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल
The गडविश्व
गोंदिया, दि. १६ : पुणे विमानतळावर एअर इंडिया एअरलाईन्समध्ये सिक्युरिटी सुपारवयझार म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा तुरकर (वय ३५, रा. खैरी, जि. बालाघाट) हिची वैनगंगा नदीच्या काठावर धारदार हत्याराने हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंडरानी (अर्जुनी) येथील वैनगंगा नदीकाठच्या जंगल परिसरात १४ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिच्यासोबत असलेल्या नितेश अग्रवाल याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
वर्षा दिवाळीनिमित्त आपल्या अडीच वर्षीय मुलीसह मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरी या मूळ गावी आली होती. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता ती गोंदिया येथील परिचित नितेश अग्रवाल याच्यासोबत बोंडरानी (अर्जुनी) वैनगंगा नदीच्या काठावर फिरायला गेली होती. सायंकाळी उशिरा नितेशने वर्षाच्या कुटुंबीयांना फोन करून घटनेची माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले असता वर्षा रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळली. तिला खैरलांजी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी सायंकाळी ७ वाजता तिला मृत घोषित केले.

लुटमारीच्या कथनामुळे संशय

नितेशने दिलेल्या माहितीनुसार, काही बुरखाधारी व्यक्तींनी लुटमार करून वर्षावर हल्ला केला. मात्र, या कथित घटनेत नितेशला कोणतीही इजा झाली नसल्याने त्याच्या कथनाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिस त्याची चौकशी करीत असून, हत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
वर्षाचे २०२१ मध्ये लग्न झाले होते. तिचा पती पुणे येथे वास्तव्यास असून, त्यांना अडीच वर्षांची मुलगी आहे. वर्षा पुणे येथे एअर इंडियाच्या विमानतळावर नोकरी करीत होती. दिवाळीसाठी ती मुलीसह माहेरी आली होती. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, खैरलांजी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदनानंतर तपासाची कागदपत्रे महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्द केली जाणार आहेत. पुढील तपास गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस करीत आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gondia #IndigoAirlines #CrimeNews #MurderCase #WaingangaRiver #MaharashtraNews #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here