आता डॉक्टरच येणार गावाच्या दारी : गडचिरोलीच्या दुर्गम भागासाठी ‘फिरते रुग्णालय’ सुरू

8

आता डॉक्टरच येणार गावाच्या दारी : गडचिरोलीच्या दुर्गम भागासाठी ‘फिरते रुग्णालय’ सुरू
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; फिरते रुग्णालय व रुग्णवाहिका सेवेसाठी ६.६२ कोटींचा निधी मंजूर
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : दुर्गम डोंगरदऱ्यांत वसलेल्या आदिवासी गावांतील नागरिकांना उपचारांसाठी आता दूरवर जाण्याची गरज भासणार नाही. आरोग्यसेवाच थेट गावाच्या दारी पोहोचविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ अर्थात फिरते रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी ४ कोटी ९९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय वैद्यकीय अधिकारी व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १ कोटी ६३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही सेवांसाठी एकूण ६ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि मुलचेरा हे तालुके दुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळखले जातात. या भागातील अनेक गावांपर्यंत पोहोचण्यासाठी आजही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात रस्ते आणि दळणवळणाच्या समस्या गंभीर बनतात. परिणामी, नागरिकांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होतात. अनेकदा साध्या आजारावरील उपचारांसाठीही तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

गावोगावी पोहोचणार अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा

या प्रकल्पांतर्गत आवश्यक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेले फिरते रुग्णालय निश्चित वेळापत्रकानुसार दुर्गम गावांमध्ये पोहोचणार आहे. गावातच नागरिकांची आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार, आवश्यक वैद्यकीय चाचण्या आणि औषधवाटप केले जाणार आहे. त्यामुळे किरकोळ आजारांसाठी नागरिकांना शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार आहे.
विशेषतः माता व बाल आरोग्य, हिवताप, क्षयरोग आणि कुपोषण यांसारख्या आरोग्य समस्यांचे वेळीच निदान करण्यावर भर दिला जाणार आहे. आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होईल. गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी जवळच्या आरोग्य संस्थेत पाठविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

रुग्णवाहिका सेवेमुळे आरोग्य यंत्रणा होणार सक्षम

फिरत्या रुग्णालयासोबतच दुर्गम भागातील नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी रुग्णवाहिका सेवाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी १ कोटी ६३ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना आवश्यकतेनुसार तातडीने उपचारासाठी जवळच्या आरोग्य संस्थेत हलविणे शक्य होणार आहे.

आदिवासी बांधवांच्या आरोग्याला मिळणार बळ

जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून खनिज बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य देण्यात येत आहे. दुर्गमतेमुळे आरोग्यसेवेपासून वंचित राहणाऱ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या गावातच तपासणी, प्राथमिक उपचार आणि औषधोपचाराच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
आरोग्यसेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दुर्गम भागातील नागरिकांचा उपचारासाठी होणारा प्रवास, वेळ आणि खर्च कमी करण्यासोबतच वेळेवर निदान व उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here