आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरेचा राज्यस्तरीय महासंगम!
भगवान बिरसा कलासंगम 2.0 या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (LIVE)
गडचिरोली : आदिवासींचा गौरव की नैसर्गिक संपत्तीची लूट? रामदास जराते यांचा सरकारला सवाल
– बिरसा मुंडांच्या विचारांचा जयघोष करताना जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण करा; प्रस्तावित लोहखाणी व प्रक्रिया प्रकल्प रद्द करा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : गडचिरोलीत क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिनाचा भव्य सोहळा साजरा होत असताना जिल्ह्यातील आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीवरच घाला घातला जात असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला आहे. आदिवासींचा गौरव करायचा आणि दुसरीकडे त्यांची नैसर्गिक संपत्ती ओरबाडायची, हा कसला सन्मान? असा सवाल उपस्थित करत जिल्ह्यातील प्रस्तावित व मंजूर लोहखाणी आणि प्रक्रिया प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात जराते यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात पाचवी अनुसूची लागू असतानाही पेसा आणि वनाधिकार कायद्यांतील तरतुदी तसेच पारंपरिक ग्रामसभांच्या अधिकारांना डावलून अतिसंवेदनशील आदिवासी भागात लोहखाणी प्रस्तावित केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रस्तावित खाण प्रकल्पांमुळे हजारो हेक्टर जंगल आणि नैसर्गिक संसाधने नष्ट होण्याची भीती असून आदिवासींच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृतीवरही त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष, आरोग्यविषयक समस्या आणि विस्थापनाचे संकट निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. आदिवासींच्या अस्तित्वालाच बाधा आणणारी सरकारची ही भूमिका त्यांच्या कोणत्या गौरवाची साक्ष देते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आश्रमशाळांतील चार आदिवासी मुलींच्या मृत्यूच्या घटनांवरूनही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. या घटनांना जबाबदार असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला पाठीशी घालून जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सोडला जात असल्याची टीका त्यांनी केली. एकीकडे आदिवासी गौरवाच्या घोषणा आणि दुसरीकडे मूलभूत सुविधांची दुरवस्था, हा विरोधाभास असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
बिरसा मुंडा यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी दिलेल्या संघर्षाचा आदर्श शासनाने प्रत्यक्ष कृतीतून दाखवावा. गडचिरोलीतील प्रस्तावित आणि मंजूर सर्व विनाशकारी लोहखाणी व प्रक्रिया प्रकल्प रद्द करून आदिवासींचे जल, जंगल, जमीन, संस्कृती आणि अस्तित्व सुरक्षित ठेवावे, असे आवाहन रामदास जराते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews
#Gadchiroli #BirsaMunda #JanjatiyaGauravDivas #TribalRights #SaveJalJungleJameen #SaveForest #SaveLand #RamdasJarate #IronOreMining #Maharashtra













