गडचिरोली : टव्वे जंगलात माओवाद्यांनी लपवून ठेवलेला स्फोटकांचा साठा जप्त; ११ कुकरसह मोठे साहित्य हस्तगत
– माओवादाच्या अस्तानंतर जंगल परिसर सुरक्षित करण्यासाठी पोलिसांची मोहीम; बीडीडीएस पथकाची कसून तपासणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ६ : जिल्ह्यात माओवादी कारवायांना आळा बसल्यानंतर आता दुर्गम जंगल परिसर पूर्णपणे सुरक्षित करण्यावर गडचिरोली पोलीस दलाने लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील गॅरापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टव्वे जंगल परिसरात जमिनीत लपवून ठेवलेला स्फोटक साहित्याचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत स्फोटकांसाठी वापरण्यात येणारे ११ कुकर, डेटोनेटर, गन पावडर, वायर आणि इतर माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, टव्वे जंगल परिसरात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जमिनीत पुरून ठेवल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ४ नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध अभियान राबविण्यात आले. यासाठी गडचिरोली विशेष अभियान पथक आणि प्राणहिता येथील चार तुकड्या तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या (बीडीडीएस) दोन पथकांना जंगल परिसरात रवाना करण्यात आले होते.
अभियानादरम्यान बीडीडीएस पथकाने परिसराची कसून तपासणी केली असता जमिनीत लपवून ठेवलेले स्फोटक साहित्य आढळून आले. यात ११ कुकर, १०० फूट कॉर्टेक्स वायरचे तीन बंडल, तीन किलो गन पावडर, चार डेटोनेटर, १२ व्होल्टची एक बॅटरी, २५० ग्रॅम फटाका दारू, चार स्टील कंटेनर, वायरचे आठ बंडल, एक सोलर प्लेट आणि इतर माओवादी साहित्याचा समावेश आहे.
भूतकाळात सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्यासाठी तसेच विविध नक्षल सप्ताह आणि निवडणुकांच्या काळात हिंसक कारवाया करण्यासाठी माओवादी जंगल परिसरात अशा प्रकारचे साहित्य गुप्तपणे लपवून ठेवत असत. त्यामुळे अशा ठिकाणांचा शोध घेऊन स्फोटक साहित्य निष्क्रिय करणे आणि संभाव्य धोके दूर करणे, या दृष्टीने पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीपणे पार पाडली. पोलीस अधीक्षकांनी या अभियानात सहभागी जवानांचे कौतुक केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #GadchiroliPolice #ExplosiveCache #MaoistFreeGadchiroli #AntiNaxalOperation #GadchiroliNews #MaharashtraPolice #BDDSTeam #Gadchiroli













