आष्टीतील शेतकरी आंदोलन अखेर मागे; महामार्ग मोकळा

3

आष्टीतील शेतकरी आंदोलन अखेर मागे; महामार्ग मोकळा
– मुख्यमंत्री फडणवीसांच्या आवाहनानंतर आंदोलकांचा निर्णय; १३ गावांतील शेतकऱ्यांचा लढा तूर्त स्थगित
The गडविश्व
गडचिरोली, दि. ५ : येणापूर–जयरामपूर परिसरातील प्रस्तावित स्टील प्रकल्पाच्या भूसंपादनाविरोधात आष्टी येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत १३ गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलन समाप्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी वरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
प्रस्तावित स्टील प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनातून आपल्या जमिनी वगळण्यात याव्यात, या मागणीसाठी येणापूर–जयरामपूर परिसरातील १३ गावांतील शेतकऱ्यांनी आष्टी येथे महामार्गावर चक्काजाम व ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे चंद्रपूर, गडचिरोली आणि दक्षिण गडचिरोलीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.
आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांना आंदोलकांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पालकर यांनी मध्यरात्री आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेत मुख्यमंत्र्यांचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन त्यांच्यापर्यंत पोहोचवले. या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईपर्यंत संबंधित भूसंपादन प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली असून, सध्या यासंदर्भात कोणतीही कार्यवाही सुरू नसल्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भूसंपादनाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या चर्चेकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही आंदोलनाच्या आदल्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यांनीदेखील शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते.
आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने आंदोलक शेतकऱ्यांना त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सांगता झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असून, प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here