एटापल्लीत अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; २७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
– दोन स्कॉर्पिओमधून दारूची वाहतूक; सहा आरोपी अटकेत, तिघांचा शोध सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि.३१ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारूची वाहतूक आणि विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एटापल्ली पोलिसांनी गुरुवारी (२९ ऑक्टोबर) रात्री सापळा रचून दारूची तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई केली. या कारवाईत दोन स्कॉर्पिओ वाहनांसह देशी दारू आणि सात मोबाईल असा एकूण २७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तिघांचा शोध सुरू आहे.
एटापल्ली पोलीस ठाण्याचे पथक गुरुवारी रात्री गस्तीवर असताना जीवनगट्टा गावात दोन संशयित वाहनांमधून देशी दारूची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जीवनगट्टा-बारसेवाडा मार्गावर सापळा रचला. काही वेळातच पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ तेथे आली. या वाहनातून दारूच्या पेट्या काळ्या रंगाच्या दुसऱ्या स्कॉर्पिओमध्ये भरल्या जात असताना पोलिसांनी परिसराला घेराव घातला.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी दोन्ही वाहनांसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोन्ही बाजूंनी वाहने अडविल्याने त्यांचा प्रयत्न फसला. पोलिसांनी घटनास्थळावरून सहा जणांना ताब्यात घेतले, तर अंधाराचा फायदा घेऊन अन्य दोघे पसार झाले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये आकाश प्रशांत मुजुमदार (३२, एटापल्ली), अफसर शेख हुसेन (३६, नागपूर), प्रशांत बजरंग आंबटकर (४३, वर्धा), पंकज शामल बारई (२९, जांबिया गट्टा), तुषार मिहीर रॉय (२५) आणि सुरत सत्यजित मंडल (२१) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी एकूण ६० पेट्या देशी दारू आणल्याचे सांगितले. त्यापैकी २९ पेट्या जीवनगट्टा येथील संतोष नरोटे याच्या घरी ठेवल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष दोन्ही वाहनांची तपासणी केली तसेच संतोष नरोटे याच्या घराची झडती घेतली. यामध्ये रॉकेट संत्री देशी दारूचे २२ बॉक्स (२ लाख २० हजार रुपये), प्रीमियम नं. १ कोकण देशी दारूचे १८ बॉक्स (१ लाख ८० हजार रुपये), पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ (८ लाख रुपये), काळ्या रंगाची स्कॉर्पिओ (१५ लाख रुपये) आणि सात मोबाईल (७० हजार रुपये) असा एकूण २७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी एटापल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११२ (२) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), ९८ आणि ८३ अंतर्गत नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या सहा आरोपींव्यतिरिक्त संतोष नरोटे, गौरव प्रभाकर माकोडे आणि मिथुन निर्मल मलिक या तिघांचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मचिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट व पोलीस अंमलदारांनी केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews
#Gadchiroli #Etapalli #GadchiroliPolice #IllegalLiquor #LiquorSmuggling #PoliceAction #CrimeNews #MaharashtraPolice #MaharashtraNews













