रांगीत श्रमदानातून दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी

3

रांगीत श्रमदानातून दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी
– पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रमाला ग्रामस्थांचा प्रतिसाद
The गडविश्व
ता.प्र/धानोरा, दि.२६ : दुष्काळी परिस्थितीवर मात करून पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने धानोरा तालुक्यातील रांगी येथे श्रमदानातून दोन वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. ग्रामपंचायत रांगी आणि पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या संयुक्त विद्यमाने २४ ऑक्टोबर रोजी हा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामपंचायत रांगी अंतर्गत निमगाव रस्त्यावरील पाल नाल्यावर हे बंधारे बांधण्यात आले. शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला अनुसरून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यास मदत होणार आहे. परिणामी परिसरातील भूजल पातळीत वाढ होण्यासोबतच शेतकरी आणि पशुधनासाठीही पाण्याची उपलब्धता वाढण्याची अपेक्षा आहे.
या उपक्रमात ग्रामपंचायतीचे प्रशासक नरेंद्र मस्के, ग्रामपंचायत अधिकारी मकरंद बांबोळे, गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, दिनेश चापले, नुरज हलामी, प्रमोद कन्नाके यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी श्रमदान केले.
तसेच नामदेव बैस, नितेश गेडाम, मंदाबाई वालदे, दीपक कुकुडकर, शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी, दोडके सर आणि नंदगीरवार सर यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. या कामासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सिमेंटच्या सुमारे ६०० रिकाम्या पोत्यांचा वापर करण्यात आला. ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारलेल्या या उपक्रमामुळे जलसंधारणाच्या कामाला चालना मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here