हेडरीत सर्पदंश झालेल्या महिलेला लॉयड्स रुग्णालयात जीवदान
– लॉयड्स रुग्णालयात १२ दिवस उपचार; चार दिवस व्हेंटिलेटरवर
The गडविश्व
हेडरी, १७ : शेतात काम करताना सर्पदंश झाल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या ३४ वर्षीय महिलेला हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी वेळेवर उपचार करून जीवदान दिले. श्वसन निकामी होण्याचा धोका आणि मूत्रपिंडाशी संबंधित गुंतागुंत निर्माण झालेल्या या महिलेची प्रकृती उपचारांनंतर सुधारली असून, १२ दिवसांनी तिला घरी सोडण्यात आले.
४ ऑक्टोबर रोजी शेतात काम करताना महिलेच्या डाव्या पायाला सापाने दंश केला. कुटुंबीयांनी प्रसंगावधान राखत अवघ्या ३० ते ४५ मिनिटांत तिला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात आणले तेव्हा तिच्या पापण्या झुकल्या होत्या, श्वासोच्छ्वास वेगाने सुरू होता आणि शुद्धीच्या पातळीत घट झाली होती.
सर्पविषामुळे श्वसन निकामी होण्याचा धोका लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने श्वसननलिका बसवून व्हेंटिलेटरवर उपचार सुरू केले. सर्पविषविरोधी औषधांसह आवश्यक उपचार देण्यात आले. महिलेला चार दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्यानंतर मूत्रपिंडाशी संबंधित गुंतागुंत आणि संपूर्ण शरीरावर सूज आल्याने अतिदक्षता विभागात तिच्यावर विशेष देखरेख करण्यात आली. अखेर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले.
या यशस्वी उपचाराबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच रुग्णाच्या कुटुंबीयांनी वेळ न घालवता तिला रुग्णालयात आणल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
सर्पदंशाची शंका आल्यास लक्षणे दिसण्याची वाट न पाहता तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. पारंपरिक उपचार किंवा झाडफुकीत वेळ घालवू नये. वेळेवर उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य होते, असे आवाहन रुग्णालयाने केले आहे.













