गोंडवाना विद्यापीठाचा निर्णय; दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

2

गोंडवाना विद्यापीठाचा निर्णय; दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
– हिवाळी-२०२६ परीक्षेसाठी भरलेले शुल्कही परत मिळणार; २३ ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी-२०२६ परीक्षेचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील संबंधित तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतीच राज्यातील सर्व कुलगुरूंसोबत ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांचे हिवाळी-२०२६ परीक्षेचे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठानेही दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शुल्कमाफी लागू केली आहे.
दरम्यान, संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षेचे शुल्क आधीच महाविद्यालयात भरले असल्यास, ते परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाविद्यालयांनी हे शुल्क विद्यापीठाकडे जमा केले असल्यास, विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना रक्कम परत केली जाणार आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संलग्नित महाविद्यालयांनी आवश्यक प्रक्रिया २३ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नवीन परशुराम मुंगळे यांनी कळविले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी या निर्णयाची नोंद घ्यावी, असे आवाहनही विद्यापीठाने केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gondwanauniversity

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here