देसाईगंज पोलिसांची मोठी कारवाई; ७.९५ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, दोन आरोपी अटकेत

2

देसाईगंज पोलिसांची मोठी कारवाई; ७.९५ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, दोन आरोपी अटकेत
– न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुगंधित तंबाखूसह चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ५ ऑक्टोबर रोजी अर्जुनी-मोरगाव ते देसाईगंज मार्गावर करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध घातला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिले आहेत.
या अनुषंगाने देसाईगंज पोलिसांना अर्जुनी-मोरगाव मार्गाने देसाईगंजकडे एका शेव्हरोलेट एन्जॉय वाहनातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अर्जुनी-देसाईगंज मार्गावर सापळा रचला. संशयास्पद वाहन दिसताच त्याचा पाठलाग करून वाहन थांबविण्यात आले.
वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये होला हुक्का शिशा तंबाखूचे ११० पॉकेट (११० किलो), ईगल हुक्का शिशा तंबाखूचे ७० पॉकेट तसेच मजा १०८ हुक्का शिशा तंबाखूचे डबे आढळून आले. या तंबाखूची अंदाजे किंमत २ लाख ९५ हजार रुपये, तर वाहनाची किंमत सुमारे ५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वाहनातील साठ्याबाबत खात्री करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम यांनी पाहणी करून सदर साठा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा असल्याची खात्री केली.
या प्रकरणी मनोहरलाल गुरुदासमन दासवानी (५९, रा. श्रीनगर वार्ड, गोंदिया) आणि प्रमोद श्रावण पटले (३९, रा. टेंबरी, गोंदिया) यांच्याविरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पुढील तपास पोउपनि. राम साबळे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंजचे प्रभारी पोनि. स्वप्नील ईज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here