रांगी येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागृती रॅली
– ‘वन्यप्राण्यांचे संवर्धन हेच पर्यावरणाचे संरक्षण’चा संदेश; वनविभागासह गावकऱ्यांचा सहभाग
The गडविश्व
ता.प्र/धानोरा, दि.०७ : वन्यजीव सप्ताहानिमित्त धानोरा तालुक्यातील रांगी येथे वनविभागाच्या वतीने ५ ऑक्टोबर रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘वन्यप्राण्यांचे संवर्धन हेच पर्यावरणाचे संरक्षण’ या संदेशातून वन व वन्यजीवांच्या संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली.
२ ते ८ ऑक्टोबरदरम्यान साजऱ्या होत असलेल्या वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर उत्तर धानोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत ही रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीदरम्यान वन्यजीवांचे संरक्षण, शिकारीला आळा, वृक्षतोड रोखणे तसेच पर्यावरणाचे संवर्धन याबाबत नागरिकांना संदेश देण्यात आला.
रॅलीमध्ये उत्तर धानोरा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी कृष्णाल ए. दोनोडे, रांगीचे क्षेत्र सहाय्यक डी. सी. करेवार, मुस्का येथील क्षेत्र सहाय्यक आर. डी. मगनूरवार, मोहली येथील क्षेत्र सहाय्यक एस. एस. कापकर, सोडे येथील क्षेत्र सहाय्यक डी. डी. दहीकर यांच्यासह वनविभागातील कर्मचारी, वन समितीचे कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वन्यजीव व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन रांगी येथील क्षेत्र सहाय्यक अधिकाऱ्यांनी केले.













