धानोऱ्यात शौचालयात आढळला इसमाचा मृतदेह; परिसरात खळबळ
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २५ : शहरातील हनुमान मंदिर परिसरात शौचालयात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
दत्तू सुरेश बावणे (वय ५२, रा. धानोरा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बावणे यांच्या पत्नीचे यापूर्वीच निधन झाले असून त्यांचा मुलगा कंपनीत कामानिमित्त बाहेरगावी राहतो. बावणे यांनी आपले राहते घर विकले होते. त्यानंतर ते एकटेच राहत होते. मिळेल ते काम करून ते उदरनिर्वाह करीत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याचेही सांगण्यात आले.
बावणे हे शौचालयातच झोपत असल्याची माहिती आहे. दरम्यान, शौचालय परिसरातून दुर्गंधी येत असल्याने शेजारील नागरिकांनी तेथे जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना बावणे यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था कुजलेल्या स्थितीत होती.
बावणे यांचा मृत्यू सुमारे दहा ते बारा दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अतिमद्यपानामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती धानोरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. या प्रकरणाचा अधिक तपास धानोरा पोलीस करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













