गडचिरोली : सुरजागडच्या खनिज वाहतुकीला नवा ‘रस्ता’, ८५.७६५ किमी मार्गासाठी ३,४२९ कोटींची शासनाची मंजुरी

154

गडचिरोली : सुरजागडच्या खनिज वाहतुकीला नवा ‘रस्ता’, ८५.७६५ किमी मार्गासाठी ३,४२९ कोटींची शासनाची मंजुरी
The गडविश्व
गडचिरोली,दि.२४ : सुरजागड परिसरातील खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २३ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करून नवेगाव–कोनसरी–मुलचेरा–हेडरी–सुरजागड या मार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. तब्बल ८५.७६५ किलोमीटर लांबीच्या या स्वतंत्र खनिज वाहतूक मार्गासाठी ३,४२९.२१ कोटी रुपयांचा एकूण प्रकल्प खर्च निश्चित करण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार हा मार्ग ‘Dedicated Mineral Transport Road’ म्हणून विकसित केला जाणार आहे. सुरजागड परिसरातील खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या मार्गामुळे संबंधित भागाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा शासनाने व्यक्त केली आहे.

बांधकामासाठी १,९६८ कोटींची तरतूद

प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी १,९६८.०६ कोटी नागरी बांधकामासाठी निश्चित करण्यात आले आहेत. जीएसटीसह प्रकल्प खर्च ३,१५४.९९ कोटी, तर भूसंपादनासाठी २७४.२२ कोटी खर्च अपेक्षित आहे. भूसंपादनासह प्रकल्पाची एकूण किंमत ३,४२९.२१ कोटी इतकी आहे.
प्रकल्पाच्या खर्चात बांधकामासोबत रॉयल्टी, देखभाल, वृक्षलागवड व त्याची देखभाल, उपयुक्तता सेवा स्थलांतर, बांधकाम कालावधीतील व्याज आणि अन्य संबंधित खर्चांचा समावेश आहे.

तीन वर्षांत बांधकाम; २४ वर्षे देखभाल

या प्रकल्पासाठी तीन वर्षांचा बांधकाम कालावधी निश्चित करण्यात आला असून त्यानंतर २४ वर्षांचा देखभाल कालावधी राहणार आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘MSRDC Navegaon Surjagarh Limited’ या विशेष उद्देशीय कंपनीची (SPV) स्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. प्रकल्प Annuity Mode पद्धतीने राबविण्याचेही निर्णयात नमूद आहे.

भूसंपादनासह विविध परवानग्यांची प्रक्रिया

प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन, विविध विभागांच्या परवानग्या आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना शासन निर्णयातून देण्यात आल्या आहेत. प्रकल्पाशी संबंधित आवश्यक करार व प्रशासकीय बाबी पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नवेगाव–कोनसरी–मुलचेरा–हेडरी–सुरजागड हा मार्ग खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र दुवा म्हणून विकसित होणार असल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे आता लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchrolinews #gadvishva #localnews #Gadchiroli #Surjagarh #MineralTransport #MiningProject #Maharashtra #MaharashtraGovernment #PWD #RoadDevelopment #Infrastructure #MineralRoad #DedicatedMineralTransportRoad #GadchiroliNews #SurjagarhMining #Navegaon #Konsari #Mulchera #Hedri #RoadProject #Development #BreakingNews #TheGadvishva #TheGDV

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here