धानोरा: पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची बँकेच्या उंबरठ्यावर चकरा

26

धानोरा: पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची बँकेच्या उंबरठ्यावर चकरा
– रांगी-मोहली संस्थांच्या कर्जफाईली महिनाभरापासून प्रलंबित, खरीप हंगामात आर्थिक कोंडी
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २२ : तालुक्यातील रांगी आणि मोहली आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत पीक कर्जासाठी सादर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जफाईली महिनाभरापासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधित शाखेकडे कर्जमंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या फाईलींवर अद्याप अंतिम कार्यवाही झालेली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
खरीप हंगामातील पिकांची निंदण, औषध फवारणी, रासायनिक खते तसेच मजुरीसह अन्य शेतीखर्चासाठी शेतकऱ्यांना सध्या पैशांची मोठी गरज आहे. पीक कर्ज मिळेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी जुने कर्ज फेडून नव्याने कर्जासाठी अर्ज केले आहेत. काही शेतकऱ्यांनी मृत वडील, पती किंवा पत्नी यांच्या नावावरील कर्जाची प्रक्रिया पूर्ण करून सभासदत्व व कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. थकीत कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनीही नव्या पीक कर्जासाठी फाईली दाखल केल्या आहेत.
मात्र, अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी उलटला तरी कर्ज मंजुरीबाबत स्पष्टता नसल्याने शेतकरी बँकेच्या चकरा मारत आहेत. ‘आज कर्ज मिळेल, उद्या मिळेल’ या आशेवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असून, हंगामातील शेतीकामांसाठी आवश्यक भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, संबंधित बँक अधिकाऱ्यांनी प्रलंबित पीक कर्जाच्या फाईलींची तातडीने तपासणी करून पात्र शेतकऱ्यांचे कर्ज मंजूर करावे आणि मंजूर रक्कम त्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावी, अशी मागणी रांगी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

“पीक कर्जाची फाईल टाकून महिना झाला”

संस्थेचा जुना सभासद असून शेतीसाठी खत, औषधे तसेच निंदणीच्या मजुरीसाठी पैशांची गरज आहे. पीक कर्जासाठी फाईल सादर करून एक महिना झाला, मात्र अद्याप कर्ज मिळालेले नाही.
– जनार्दन बांबोळे, शेतकरी

“वडिलांच्या निधनानंतर प्रक्रिया पूर्ण केली, तरी कर्जाची प्रतीक्षा”

माझे वडील रांगी संस्थेचे सभासद होते. त्यांच्या निधनानंतर मी सभासद नोंदणी करून पीक कर्जासाठी फाईल सादर केली. मात्र, आजतागायत पीक कर्ज मिळालेले नाही. कर्जाच्या प्रतीक्षेत असून शेतीच्या हंगामासाठी आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.
– राकेश कोराम, शेतकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here