धानोऱ्यात मोफत आरोग्य शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– विविध आरोग्य तपासण्यांसह रुग्णांना मोफत औषधांचे वाटप
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २ : गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनमित्र गणेश उत्सव मंडळ, धानोरा (वॉर्ड क्र. १०/११) यांच्या पुढाकारातून समाज मंदिर सभागृहात एकदिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय विविध रक्त तपासण्यांची सुविधाही मोफत उपलब्ध करून देण्यात आली. तपासणीनंतर गरजेनुसार रुग्णांना मोफत गोळ्या व औषधांचे वाटप करण्यात आले.
या शिबिरात डॉ. बगराज धुर्वे, डॉ. शेडमाके, डॉ. सीमा गेडाम, गणेश कुळमेथे व अनंत कन्नाके यांनी रुग्णांची तपासणी केली. तसेच गौतम राऊत, रोशन निकोडे, रिया कडाम, गीता वनपत्तीवार, अंतकला कोडापे आणि आशा वर्कर माधुरी गुरनुले यांनी वैद्यकीय सेवेत विशेष योगदान दिले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष वीरेंद्र गावातुरे, उपाध्यक्ष मंगल मोहूर्ले, सचिव सचिन गावतूरे, सहसचिव सूरज कोकोड, कोषाध्यक्ष पंकज गावातुरे यांच्यासह अवी गुरनुले, राकेश उसेंडी आणि चेतन रांगडाले यांनी परिश्रम घेतले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मनोरंजनासोबतच समाजोपयोगी उपक्रमाला प्राधान्य देत मंडळाने आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.













