सावली : वाघाच्या हल्ल्यात गुरे चारणारा शेतकरी ठार
– वैनगंगा नदीकाठावरील निलसनी पेटगाव परिसरातील घटना
The गडविश्व
सावली, दि. १७ : वैनगंगा नदीकाठावर गुरे चारण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला करून ठार केल्याची घटना सावली वनपरिक्षेत्रातील सामदा वन बीटाच्या निलसनी पेटगाव परिसरात गुरुवारी घडली. वासुदेव वाकुडकर, रा. निलसनी पेटगाव, ता. सावली, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वाकुडकर यांच्यासह काही शेतकरी नेहमीप्रमाणे गुरे घेऊन वैनगंगा नदीकाठावरील मोकाट जागेत चराईसाठी गेले होते. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक वाकुडकर यांच्यावर झडप घातली. वाघाच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सहकाऱ्यांनी आरडाओरड करून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ल्यानंतर घाबरलेल्या शेतकऱ्यांनी गावाच्या दिशेने धाव घेतली. काही शेतकऱ्यांनी सामदा वन बीटाचे वनरक्षक शेडमाके यांना मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वनरक्षक शेडमाके नर्सरीच्या कामासाठी असलेल्या मजुरांसह घटनास्थळी पोहोचले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.
दरम्यान, वनविभागाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनेचा पुढील तपास वनविभाग आणि पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.
वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने निलसनी पेटगावसह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नदीकाठच्या शेतजमिनी आणि चराई क्षेत्रात वाघाचा वावर असल्याने शेतकरी व पशुपालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाघाचा बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षितता मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.













