तळेगाव गाव तलावात भलामोठा अजगर जाळीत अडकला; वनरक्षकांच्या धाडसी प्रयत्नांनी मिळाले जीवदान

3

तळेगाव गाव तलावात भलामोठा अजगर जाळीत अडकला; वनरक्षकांच्या धाडसी प्रयत्नांनी मिळाले जीवदान
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. १३ : तळेगाव येथील गाव तलावाच्या सांडव्यावर माशांना वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी लावलेल्या जाळीत ६ ते ७ फूट लांबीचा भलामोठा अजगर अडकल्याची घटना समोर आली. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तसेच वनरक्षकांच्या तत्परतेने या अजगराची सुरक्षित सुटका करण्यात आली. त्यानंतर त्याला मौशी जंगलात सुखरूप सोडण्यात आले.
तळेगाव गाव तलावाच्या सांडव्यावरील माशांची जाळी तपासत असताना स्थानिकांना जाळीत अजगर अडकलेला दिसून आला. गावकऱ्यांनी तत्काळ याची माहिती तळेगावच्या वनरक्षक कु. अनिता आतला यांना दिली. माहिती मिळताच अनिता आतला यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.
अजगर जाळीत घट्ट अडकलेला असल्याने त्याला बाहेर काढताना विशेष काळजी घेणे आवश्यक होते. वनरक्षक अनिता आतला यांनी गावकऱ्यांच्या मदतीने प्रयत्न सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर अजगराला जाळीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
सुमारे ६ ते ७ फूट लांबी आणि १२ ते १५ किलो वजन असलेल्या या अजगराला तलावालगतच्या मौशी जंगलात नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. वनरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे एका वन्यजीवाचा जीव वाचला. या तत्पर कारवाईबद्दल तळेगावातील गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here