Gadchiroli News: गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेला झालंय तरी काय? १५ दिवसांत आणखी एक माता-बाल मृत्यू
– महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीदरम्यान माता आणि नवजात बाळाचा मृत्यू; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : जिल्ह्यातील माता-बाल मृत्यूच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याने गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ८ सप्टेंबर रोजी महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीदरम्यान एका महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. अवघ्या १५ दिवसांत माता-बाल मृत्यूची ही तिसरी घटना असल्याने आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथील ३१ वर्षीय दिव्या रामसिंग उसेंडी यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर ८ सप्टेंबर रोजी कुटुंबीयांनी मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोलीतील महिला व बाल रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात प्रसूतीदरम्यान दिव्या आणि त्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे गेल्या काही दिवसांतील दोन माता-बाल मृत्यूच्या घटनांचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. २३ ऑगस्ट रोजी चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील २३ वर्षीय जिजा हंसराज सातर आणि त्यांच्या बाळाचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता.
त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कोजबी येथील २८ वर्षीय नाजुका दिवाकर राऊत आणि त्यांच्या नवजात बाळाचा महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.
दोन घटनांनंतरही पुन्हा माता-बाल मृत्यू झाल्याने रुग्णालयातील प्रसूती व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रसूती विभागातील वैद्यकीय मनुष्यबळ, उपचारांची उपलब्धता, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने निर्णय घेण्याची क्षमता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण यांचा आढावा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आजाद समाज पक्षाचा प्रशासनावर निशाणा
सलग माता-बाल मृत्यूच्या घटनांवर आजाद समाज पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. एकाच रुग्णालयात वारंवार अशा घटना घडत असतील, तर त्याकडे केवळ दुर्दैवी घटना म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.
मागील प्रकरणांमध्ये दोषींची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई झाली असती, तर यंत्रणा अधिक सतर्क झाली असती, असा दावा पक्षाने केला आहे. प्रत्येक माता-बाल मृत्यूची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, जिल्हा शल्य चिकित्सकांची प्रशासकीय जबाबदारी निश्चित करावी, दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि महिला व बाल रुग्णालयातील प्रसूती विभागाचे तातडीने ऑडिट करावे, अशी मागणी पक्षाने केली आहे.
“आणखी किती माता-बालकांचे जीव गेल्यानंतर आरोग्य विभागाला जाग येणार?” असा सवाल आजाद समाज पक्षाने उपस्थित केला आहे. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला आहे.
दरम्यान, ८ सप्टेंबर रोजी झालेल्या ताज्या माता-बाल मृत्यू प्रकरणाबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण काय, तसेच उपचारादरम्यान काही निष्काळजीपणा झाला का, याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













