Gadchandur Bribe Case: उत्पन्नाच्या दाखल्यासाठी ८१ रुपयांची लाच, सेतू केंद्र चालक एसीबीच्या जाळ्यात
The गडविश्व
चंद्रपूर, दि.०८ : उत्पन्नाचा दाखला काढून देण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करणाऱ्या सरकारमान्य सेतू केंद्र चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी (७ सप्टेंबर) रंगेहात पकडले. सचिन रामचंद्र खैरे (४०), रा. गडचांदूर, वॉर्ड क्रमांक ३, ता. कोरपना, जि. चंद्रपूर, असे आरोपीचे नाव आहे.
एका ५२ वर्षीय तक्रारदाराने उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गडचांदूर येथील त्रिशा ऑनलाईन सर्व्हिसेस या सरकारमान्य सेतू केंद्रात अर्ज केला होता. या दाखल्यासाठी ६९ रुपये शासकीय शुल्क निश्चित असताना आरोपीने तक्रारदाराकडे एकूण २०० रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यातील १३१ रुपये अतिरिक्त रक्कम लाच म्हणून मागितल्याचा आरोप आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने ७ सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी केली. यावेळी आरोपीने ६९ रुपये शासकीय शुल्कासह २०० रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती १५० रुपये स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य केले.
यानंतर एसीबीने सापळा रचला. तक्रारदार पंचांसह सेतू केंद्रात गेल्यानंतर आरोपी खैरे याने ६९ रुपये शासकीय शुल्क आणि ८१ रुपये लाच, अशी एकूण १५० रुपयांची रक्कम स्वीकारली. रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीच्या अटकेची नोंद करण्यात येणार असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक अनिल जिटट्टावार यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. सापळा पथकात एसीबी चंद्रपूरचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews













