गडचिरोली : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किसान काँग्रेस आक्रमक, शासनाला आंदोलनाचा इशारा

66

गडचिरोली : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किसान काँग्रेस आक्रमक, शासनाला आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत शासनासमोर विविध मागण्या मांडल्या. या मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पाष्टे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दीपक वाढई आणि दृष्टांत किरसान यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत विमानतळ आणि एमआयडीसीसाठी सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण करण्याच्या हालचाली सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरवळा, राखी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी विमानतळासाठी प्रस्तावित करण्यात आल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांची संमती न घेता जमीन अधिग्रहित करू नये, अशी मागणी करण्यात आली.
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा, मुधोलीसह परिसरातील १२ ते १४ गावांतील सुपीक जमीन एमआयडीसीसाठी अधिग्रहित करण्याच्या हालचाली थांबवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली. औद्योगिकीकरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे शेतीवर आधारित उपजीविकेचे साधन हिरावून घेऊ नये, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून धानाला प्रतिक्विंटल ४ हजार रुपये हमीभाव आणि प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये बोनस देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. खत, बियाणे, औषधे, मजुरी आणि यांत्रिकीकरणाचा खर्च वाढला असताना शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याचे सांगण्यात आले.
शेतीपंपांसाठी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंचन करावे लागते. वेळेवर वीज न मिळाल्यास पिकांचे नुकसान होत असल्याने शासनाने याबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
जिल्ह्यातील वाघ, रानटी हत्ती यांसह वन्यप्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच शेतीच्या नुकसानीपोटी हेक्टरी ४० हजार रुपये मदत देण्यात यावी. तसेच वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ६० लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, आदिवासी विकास महामंडळ आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना विकलेल्या धानाची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळत नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे धान विक्रीनंतर सात दिवसांच्या आत विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा किसान काँग्रेसच्या माध्यमातून व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही पत्रकार परिषदेतून पराग पाष्टे, वामन सावसाकडे, दीपक वाढई आणि दृष्टांत किरसान यांनी दिला.
यावेळी धर्माजी बगमारे, भास्कर बांडे, भास्कर दोनाडकर, महादेव पत्रे, प्रयेश दर्वे, बळीराम दर्वे, अब्दुल भाई पंजवानी, दिलीप मेश्राम, मनोज अग्रवाल, किशोर वानखेडे, मिलिंद खोब्रागडे, पांडुरंग पेशने यांच्यासह किसान काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #Gadchiroli #GadchiroliNews #GadchiroliFarmers #FarmersIssues #FarmersProtest #KisanCongress #MaharashtraFarmers #FarmerDemands #PaddyFarmers #PaddyMSP #MSP #FarmerBonus #LandAcquisition #AirportLandAcquisition #MIDC #ElectricityForFarmers #WildlifeConflict #FarmerCompensation #AgricultureNews #MaharashtraNews #Vidarbha #VidarbhaFarmers #FarmersRights #FarmerMovement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here