कोटगूल : घरामागे फुलवली गांजाची बाग; २१ लाखांचा गांजा जप्त
– मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे ताब्यात, आरोपी अटकेत
The गडविश्व
ता. प्र/ कोरची, दि. ०७ : घराच्या पाठीमागील सांदवाडीत गांजाची लागवड करून विक्रीच्या तयारीत असलेल्या ५८ वर्षीय व्यक्तीला गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले. कोटगूल पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांगपूर येथे केलेल्या संयुक्त कारवाईत ४३ किलो ६५३ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. या अंमली पदार्थाची किंमत २१ लाख ८२ हजार ६५० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नांगपूर येथील आधारी धनसिंग कुवरढेरीया (५८) याने घराच्या मागील सांदवाडीत गांजाची अवैध लागवड केल्याची गोपनीय माहिती कोटगूल पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगूल पोलिसांचे पथक नांगपूर येथे रवाना झाले.
पोलिस पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष संशयिताच्या घरामागील सांदवाडीची झडती घेतली. यावेळी तेथे गांजाची झाडे लागवड केलेली आढळून आली. तपासणीत ४३.६५३ किलो कॅनॅबिस वनस्पती (गांजा) आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून, त्याची किंमत प्रति किलो ५० हजार रुपये या दराने २१ लाख ८२ हजार ६५० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गांजाची लागवड विक्रीच्या उद्देशाने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आरोपीविरुद्ध कोटगूल पोलिस ठाण्यात अप. क्र. १३/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विवेक वायकर करीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात अवैध कारवायांना आळा घालून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी अंमली पदार्थांची तस्करी तसेच इतर अवैध कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे तसेच कोटगूल पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विवेक वायकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत स्वप्नील कुडावले, प्रशांत गरफडे, रोहित गोंगले, शिवप्रसाद करमे, रामदास उईनवार, श्यामलाल नैताम, मनोज नैताम, अनिल हिडामी आणि प्रभु तिलारे सहभागी होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













