गोवंश तस्करीचा डाव फसला ; एटापल्ली पोलिसांनी ८८ जनावरांसह ३८.२० लाखांचा मुद्देमाल केला जप्त

32

गोवंश तस्करीचा डाव फसला ; एटापल्ली पोलिसांनी ८८ जनावरांसह ३८.२० लाखांचा मुद्देमाल केला जप्त
– दोन ट्रक ताब्यात, चालकांनी जंगलातून काढला पळ, आठवडाभरातील चौथी मोठी कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : अवैध गोवंश वाहतुकीविरोधात एटापल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत दोन ट्रकसह तब्बल ८८ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, गेल्या आठवडाभरात कोटगुल, कुरखेडा आणि एटापल्ली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गोवंश तस्करीविरोधात झालेली ही सलग चौथी मोठी कारवाई आहे.(Gadchiroli)
२५ ऑगस्टच्या रात्री एटापल्ली पोलीस पथक शहरात गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की, गोवंशीय जनावरांनी भरलेला ट्रक एटापल्लीमार्गे जाणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी आलेंगाटोला येथील कसनसूर–आलापल्ली मार्गावर सापळा रचला.
२६ ऑगस्टच्या पहाटे संशयित ट्रक येताना दिसताच पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबविता पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर गुरुपल्लीजवळ चालकाने ट्रक सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये कोंबून भरलेली ४० गोवंशीय जनावरे आढळून आली.
दरम्यान, याच मार्गावरून आणखी एक ट्रक गोवंशीय जनावरे घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुन्हा नाकाबंदी केली. पोलिसांना पाहताच दुसऱ्या ट्रकचालकानेही वाहन सोडून जंगलात पळ काढला.
पंचांसमक्ष दोन्ही वाहनांची तपासणी केली असता टीएस ०८ यूबी ५७७९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये ४०, तर एपी १६ टीई १२३८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये ४८ गोवंशीय जनावरे आढळली. जनावरांची एकूण किंमत १३ लाख २० हजार रुपये, तर दोन्ही ट्रकांची अंदाजे किंमत २५ लाख रुपये आहे. अशाप्रकारे ८८ जनावरे आणि दोन ट्रक असा एकूण ३८.२० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी एटापल्ली पोलीस ठाण्यात अप. क्र. १६९/२०२६ अन्वये अज्ञात वाहनचालक व मालकांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छींद्र नागरगोजे करीत आहेत.

आठवडाभरात १४५ जनावरांची सुटका

गडचिरोली पोलिसांनी गोवंश तस्करीविरोधात कारवाईची तीव्रता वाढविली असून कोटगुल, कुरखेडा आणि एटापल्ली हद्दीत आठवडाभरात चार मोठ्या कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमध्ये आतापर्यंत १४५ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी, अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छींद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #gadchirolilocalnews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here