धानोरा : त्या मार्गाच्या नरकयातना कधी संपणार? दोन वर्षांपासून रखडलेला सालेभट्टी–ढवळी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

37

धानोरा : त्या मार्गाच्या नरकयातना कधी संपणार? दोन वर्षांपासून रखडलेला सालेभट्टी–ढवळी महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
– तीन चिमुकल्यांचा बळी गेल्यानंतरही प्रशासनाला जाग कधी येणार?
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १७ : सालेभट्टी ते ढवळी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वरील रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा फटका आता थेट नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अपूर्ण असलेल्या या मार्गाच्या दुरवस्थेमुळे १० ऑगस्ट रोजी जपतलाई येथील आश्रमशाळेतील सर्पदंश झालेल्या तीन शाळकरी मुलींना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यास तब्बल एक तासाचा विलंब झाला. दुर्दैवाने तिन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संतप्त सवाल उपस्थित झाले आहेत.

आणीबाणीच्या वेळी रस्ता ठरतोय जीवघेणा

सर्पदंशासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. मात्र, सालेभट्टी–ढवळी मार्गावरील खड्डे, उखडलेला रस्ता आणि वाहतुकीची बिकट अवस्था यामुळे रुग्णालय गाठण्यासाठी मोठा वेळ खर्ची पडत आहे. तीन मुलींना वेळेत उपचार मिळू न शकल्याने त्यांचा जीव गेला, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.या घटनेमुळे रस्त्याची दुरवस्था केवळ गैरसोयीची नसून जीवघेणी ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

दोन वर्षांपासून काम रखडले

या महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, गेल्या महिनाभरापासून या मार्गावरील एसटी बससेवाही बंद करण्यात आली आहे.
त्यामुळे धानोरा येथे शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. काही विद्यार्थ्यांचे शिक्षणही प्रभावित झाले असून, सायंकाळी परतीसाठी बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

‘उद्या एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेला तर?’

“आज तीन चिमुकल्यांचा बळी गेला. उद्या एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा गंभीर आजारी रुग्णाचा या रस्त्यामुळे जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

मुरूम-मातीची मलमपट्टी; पावसात चिखलाचा धोका

खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडून मुरूम आणि माती टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, पावसाळ्यात ही माती चिखलात रूपांतरित होत असल्याने रस्ता आणखी धोकादायक बनतो. त्यामुळे तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी रस्त्याची मागणी जोर धरत आहे.
‘आपले सरकार’ तक्रार पोर्टलवर तक्रार केल्यानंतर हा मार्ग वनक्षेत्रातून जात असल्याने वनविभागाची परवानगी न मिळाल्यामुळे काम रखडल्याचे उत्तर मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

परवानगीला विलंब असेल तर डांबरीकरण तरी करा

संपूर्ण रस्त्याच्या सिमेंटकरणासाठी वनविभागाच्या परवानगीची आवश्यकता असल्यास ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. पूर्वी अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या भागाचे तातडीने डांबरीकरण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तीन निष्पाप मुलींच्या मृत्यूने सालेभट्टी–ढवळी मार्गाची दुरवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. आता तरी प्रशासन ठोस पावले उचलणार का, की आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर या मार्गाच्या नरकयातना संपणार, असा जळजळीत सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
#thegdv #thagadvishva #gadchirolinews #BreakingNews #LatestNews #IndiaNews #NewsUpdate #ViralNews #Dhanora #Maharashtra #RoadAccident #NationalHighway #RoadSafety #RoadCondition #RoadDevelopment #PublicSafety #GovernmentAccountability #RoadNeglect #SchoolGirls #SnakeBite #HealthcareEmergency #RuralRoads #MaharashtraNews #BreakingNews #LocalNews #DhanoraNews #Gadchiroli #GadchiroliNews #HighwaySafety #Infrastructure #SaveLives #RoadRepair #PublicDemand

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here