जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

56

जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
– आश्रमशाळांच्या सुरक्षेसाठी नवी ‘एसओपी’; १४ ऑगस्टला उच्चस्तरीय बैठक – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांसाठी नवीन प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिली.
जपतलई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात रात्री सुमारे २ वाजता विद्यार्थिनींना सर्पदंश झाला. या दुर्घटनेत दीपिका इतवा लकडा (वर्ग ६), सुष्मिता सरोजीत मंडल (वर्ग ८) आणि अनु गाजुरं कोरेटी (वर्ग २) या तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्पदंश झालेल्या अन्य विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून, गंभीर प्रकृती असलेल्या दीपिका मडावी हिला प्रशासनाने एअरलिफ्ट सुविधेद्वारे पुढील उपचारासाठी हलविले.

घटनेनंतर सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी धानोरा येथील शवागृहात मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर जपतलई येथील आश्रमशाळेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश उपस्थित होते.

“ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कुटुंबीयांची भेट आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर काही बाबींमध्ये अधिक जागरूकता व जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले आहे. काही स्तरांवर झालेल्या त्रुटींचा आढावा घेऊन भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रत्येकाने आवश्यक दक्षता घेणे गरजेचे आहे,” असे ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

१४ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

आश्रमशाळांच्या व्यवस्थापनासह विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात गठित विविध समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच शासन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्याच्या दृष्टीने १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात येणार आहे.
या बैठकीत विद्यार्थी सुरक्षा, आश्रमशाळा व्यवस्थापन, विविध समित्यांचे कामकाज, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संबंधितांची जबाबदारी यांचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर आश्रमशाळांसाठी नवीन एसओपी निश्चित करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीतूनही अतिरिक्त मदतीचा प्रस्ताव

दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार आहे. त्यापैकी प्रत्येकी १ लाख रुपयांची तात्काळ मदत कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली असून, उर्वरित मदतीची प्रक्रिया सुरू आहे.
याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी अतिरिक्त ५ लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. अन्य शासकीय योजनांच्या माध्यमातूनही संबंधित कुटुंबीयांना शक्य ते सर्व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.
जपतलई येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेच्या उपाययोजनांचा फेरआढावा घेतला जाणार असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक सुधारणा करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here