बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाकेंच्या जयघोषाने दुमदुमले धानोरा ; आदिवासी दिन उत्साहात

32

बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाकेंच्या जयघोषाने दुमदुमले धानोरा ; आदिवासी दिन उत्साहात
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. ९ : जागतिक आदिवासी दिनानिमित्त धानोरा शहरात आदिवासी अस्मिता, शौर्य आणि समृद्ध संस्कृतीचा जागर करण्यात आला. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा आणि आदिवासी स्वातंत्र्यवीर वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयघोषाने शहर दुमदुमले. दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी आदरपूर्वक अभिवादन केले.
जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच शहरात आदिवासी बांधवांसह नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. विविध संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले. पारंपरिक संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवत हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान यावेळी अधोरेखित करण्यात आले. जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी आदिवासी वीरांनी दिलेले बलिदान आणि केलेला संघर्ष आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
भगवान बिरसा मुंडा आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या संघर्षातून प्रेरणा घेत आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक एकजूट अधिक मजबूत करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
उत्साही आणि मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे धानोरा शहरात जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह दिसून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here