मुसळधार पावसाचा इशारा ; गडचिरोली जिल्ह्यात उद्या सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी

12

मुसळधार पावसाचा इशारा ; गडचिरोली जिल्ह्यात उद्या सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी
– रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
The गडविश्व
गडचिरोली, दि.२८ : भारतीय हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्यासाठी बुधवार, २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी २९ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर केली आहे.
या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तसेच इतर व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एक दिवसाची सुटी राहणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, बांडिया आणि इंद्रावती नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची तसेच अनेक ठिकाणी नाले-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ तसेच इतर लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

#Thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #RainAlert #RedAlert #SchoolHoliday #CollegeHoliday #HeavyRain #IMD #DistrictCollector #Maharashtra #WeatherUpdate #StudentSafety #Monsoon2026

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here