चंद्रपूर : २० हजारांची लाच स्वीकारताना वनपाल, वनरक्षकासह तिघे ताब्यात
The गडविश्व
चंद्रपूर, दि.२८ : अवैध रेती वाहतूक प्रकरणातील कारवाईची कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), चंद्रपूरच्या पथकाने २७ जुलै ला धडक कारवाई करत वनपाल, वनरक्षक आणि खासगी इसमाला ताब्यात घेतले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीत घरबांधणीसाठी रेती वाहतूक केली जात असताना ७ जुलै रोजी रात्री वनक्षेत्र सहाय्यक कार्यालय भद्रावती येथील वनपाल कोमल नरसिंगराव घुगलोत (४२) आणि वनरक्षक संदीप पुंडलिक पारखे (३९) यांनी ट्रॅक्टर अडवून वनक्षेत्र सहायक कार्यालय, भद्रावती येथे नेले. त्यानंतर अवैध रेती वाहतुकीच्या कारवाईची कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.
तक्रारदाराने २३ जुलै रोजी एसीबी, चंद्रपूरकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत तक्रार सत्य आढळल्यानंतर २७ जुलै रोजी सापळा रचण्यात आला. त्यावेळी आरोपींनी खासगी इसम ललित दिलीप नागपूरे मार्फत २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान व अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार आणि एसीबी चंद्रपूरच्या सापळा पथकाने केली.
दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एजंटामार्फत कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.













