पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची निवड
The गडविश्व
ता. प्र / धानोरा,दि. २७ : विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण आणि जबाबदारीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, रांगी (ता. धानोरा) येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक लोकशाही पद्धतीने व अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
निवडणुकीसाठी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यात आले. या प्रक्रियेत शाळेतील सुमारे २०० विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत लोकशाही पद्धतीने प्रचार केला.
निवडणुकीच्या निकालानुसार इयत्ता सातवीतील कु. तनुश्री पोलोजवार यांची शालेय मुख्यमंत्री म्हणून, तर कु. खिलेश्वरी कावळे यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर मुख्याध्यापिका सौ. गायत्री चौधरी यांनी देखरेख ठेवली. कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन नंदगिरीवार सर आणि काटेंगे सर यांनी केले. मतदार यादी तयार करणे, मतपत्रिका छपाई, मतदान केंद्राचे नियोजन तसेच निकालपत्रक व्यवस्थापनाची जबाबदारी विकास दोडके सर व नंदू जांगी सर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती चांगले मॅडम, श्रीमती सयाम मॅडम, बोरसरे, होळी मॅडम आणि टेंभुर्णे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेचा अनुभव मिळाला असून नेतृत्व, जबाबदारी आणि मतदानाचे महत्त्व यांची प्रभावी जाणीव झाली.













