कुरखेडा–वाकडी मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य; डंपिंग यार्ड असतानाही रस्त्यावरच कचरा, नागरिक संतप्त

35

कुरखेडा–वाकडी मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य; डंपिंग यार्ड असतानाही रस्त्यावरच कचरा, नागरिक संतप्त
– दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर, कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. २६ : कुरखेडा नगर पंचायत हद्दीतील कुरखेडा–वाकडी मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी वाढली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, काही अंतरावर नगर पंचायतीचे डंपिंग यार्ड उपलब्ध असतानाही काही बेजबाबदार व्यक्तींकडून सार्वजनिक रस्त्यावरच कचरा टाकण्याचा प्रकार सुरू असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हिरवाईने नटलेला आणि दोन्ही बाजूंनी वृक्षराजीने वेढलेला कुरखेडा–वाकडी मार्ग हा सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी नागरिकांची पसंतीचा मार्ग मानला जातो. वाकडीसह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि नोकरदार दररोज या रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे असह्य दुर्गंधी पसरत असून संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी नगर पंचायतीने तातडीने रस्त्यावरील कचरा हटवून परिसर स्वच्छ करावा, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय या मार्गावर “येथे कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे” असे इशारा फलक लावून नियमांचे काटेकोर पालन करावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करून कुरखेडा–वाकडी मार्ग पूर्वीप्रमाणे स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगर पंचायतीने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here