आषाढी एकादशीचा भक्तिमय जल्लोष ; संस्कार पब्लिक स्कूलमध्ये दिंडी, अभंग-भजनांनी विठ्ठलमय वातावरण

48

आषाढी एकादशीचा भक्तिमय जल्लोष ; संस्कार पब्लिक स्कूलमध्ये दिंडी, अभंग-भजनांनी विठ्ठलमय वातावरण
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २६ : आषाढी एकादशीच्या निमित्ताने कुरखेडा येथील संस्कार पब्लिक स्कूलमध्ये भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत टाळ-मृदुंगाच्या गजरात विठ्ठल-रुक्मिणीच्या नामस्मरणासह भव्य दिंडी काढत “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून सोडला.
कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना संत परंपरेची ओळख करून देणे, भारतीय संस्कृतीचे संवर्धन करणे तसेच सामाजिक ऐक्य आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा देणे हा होता. यावेळी विद्यार्थ्यांनी अभंग, भजन तसेच विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम भक्तिरसात न्हाऊन निघाला.
याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष वामनराव फाये, संस्थेचे सचिव दोषहर फाये आणि शाळेचे प्राचार्य देवेंद्र फाये उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व पटवून देत संतांच्या विचारांचे अनुकरण करून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती ढाकळे यांनी केले, तर सानू बैस यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या भक्तिमय सोहळ्यामुळे शाळेचे वातावरण विठ्ठलमय झाले असून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि अध्यात्माविषयी आदर, श्रद्धा व जिव्हाळा अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here