१८० किमी दूरच्या अधिकाऱ्याकडे एटापल्लीचा कारभार; एकाच अधिकाऱ्यावर तीन पंचायत समित्यांचा भार

10

१८० किमी दूरच्या अधिकाऱ्याकडे एटापल्लीचा कारभार; एकाच अधिकाऱ्यावर तीन पंचायत समित्यांचा भार
– पूर्णवेळ गटविकास अधिकाऱ्याच्या नियुक्तीची मागणी ; निर्णयावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह
The गडविश्व
एटापल्ली, दि. २१ : एटापल्ली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे हे ३१ जुलै २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त होणाऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देसाईगंज (वडसा) पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी निलेश ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, ठाकरे यांच्याकडे यापूर्वीच देसाईगंज (वडसा) आणि अहेरी पंचायत समित्यांचा पदभार असल्याने आता एकाच अधिकाऱ्यावर तीन पंचायत समित्यांची जबाबदारी येणार आहे. या निर्णयामुळे एटापल्लीतील प्रशासन आणि विकासकामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एटापल्ली हा गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल आणि भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण तालुका आहे. येथे ३१ ग्रामपंचायती असून, मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व बालविकास तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर गटविकास अधिकाऱ्यांची महत्त्वाची जबाबदारी असते.
मात्र, एटापल्लीपासून सुमारे १८० किलोमीटर अंतरावरील देसाईगंज येथील अधिकाऱ्याकडे अतिरिक्त पदभार सोपविल्याने ते प्रत्यक्षात एटापल्लीतील कामकाजासाठी किती वेळ देऊ शकतील, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतींची पाहणी, विकासकामांची तपासणी, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण, निधीचा वापर आणि नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची नियमित उपस्थिती आवश्यक असताना, तीन पंचायत समित्यांचा कारभार एकाच अधिकाऱ्यावर सोपविण्याच्या निर्णयावर टीका होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, एटापल्लीसारख्या दुर्गम तालुक्याला पूर्णवेळ गटविकास अधिकारी देण्याऐवजी अतिरिक्त पदभारावर प्रशासन चालविणे म्हणजे ग्रामीण विकासाला दुय्यम स्थान देण्यासारखे आहे. त्यामुळे शासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने पूर्णवेळ गटविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सीईओंच्या निर्णयावर उपस्थित झाले प्रश्न

एटापल्ली पंचायत समितीत अतिरिक्त गटविकास अधिकारी उपलब्ध असताना किंवा जवळच्या पंचायत समितीतील अधिकाऱ्याकडे अतिरिक्त पदभार देता आला असता, तब्बल १८० किलोमीटर दूरच्या अधिकाऱ्याचीच निवड का करण्यात आली, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. संबंधित अधिकाऱ्याकडे अशी कोणती विशेष प्रशासकीय क्षमता आहे की त्यांच्यावर देसाईगंज (वडसा), अहेरी आणि एटापल्ली अशा तीन पंचायत समित्यांची जबाबदारी सोपविण्यात आली, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

‘स्पष्टीकरण द्या, अन्यथा आंदोलन’

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, “एटापल्लीसारख्या अतिदुर्गम तालुक्याचा कारभार १८० किलोमीटर दूरच्या अधिकाऱ्यावर सोपविणे हा अव्यवहार्य निर्णय आहे. जवळचे अधिकारी उपलब्ध असताना दूरच्या अधिकाऱ्याचीच निवड का करण्यात आली, याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे. एटापल्लीला तात्काळ पूर्णवेळ गटविकास अधिकारी नियुक्त न केल्यास जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here