चिखलाच्या विळख्यात अडकला राष्ट्रीय महामार्ग 930; दोन ट्रक रुतल्याने वाहतूक ठप्प

20

चिखलाच्या विळख्यात अडकला राष्ट्रीय महामार्ग 930; दोन ट्रक रुतल्याने वाहतूक ठप्प
– कंत्राटदाराच्या हलगर्जीचा फटका ; गिरोला–लेखा मार्गावर प्रवाशांचे प्रचंड हाल
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २१ : गडचिरोली–धानोरा मार्गे छत्तीसगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वर गिरोला–लेखा दरम्यान सोमवारी (20 जुलै) सायंकाळी सुमारे 6.30 वाजता दोन अवजड ट्रक चिखलात रुतल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्याच्या कामात कंत्राटदाराने मुरूमाऐवजी मातीचा वापर केल्याने सततच्या पावसात रस्ता चिखलमय झाला असून, त्याचा फटका वाहनचालकांसह शेकडो प्रवाशांना बसला.
स्थानिकांच्या माहितीनुसार, रस्त्याच्या मध्यभागी दोन्ही ट्रक खोल चिखलात अडकल्यामुळे चारचाकी वाहने, बस आणि मालवाहू वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद पडली. रस्ता अरुंद व खड्डेमय असल्याने केवळ दुचाकीस्वार जीव धोक्यात घालून मार्ग काढताना दिसून आले.
सायंकाळच्या वेळी ही घटना घडल्याने कामावरून घरी परतणारे कर्मचारी, शेतकरी, विद्यार्थी आणि इतर प्रवासी तासन्‌तास रस्त्यावर अडकून पडले. धानोरा–गडचिरोली मार्गावरील बससेवाही विस्कळीत झाली. अंधार पडल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडीची गंभीर परिस्थिती निर्माण झाली.
स्थानिक नागरिकांनी या महामार्गावरील खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम आणि अपुऱ्या देखभालीबाबत यापूर्वीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वारंवार तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्याने अखेर वाहतूक ठप्प होण्याची वेळ आल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, चिखलात अडकलेले ट्रक तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करावी आणि रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here