राष्ट्रीय महामार्ग 543 ची कुरखेड्यात चाळण; पावसाने निकृष्ट कामाचा बोजवारा उघड केला
– मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी ; वाहनचालक व पादचाऱ्यांचा जीव धोक्यात
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १८ : कुरखेडा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 ची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत असून, पावसाने महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामाचा बोजवारा उघड केला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
शनिवारी सकाळी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये महामार्गाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे स्पष्ट दिसून आले. पाण्याखाली खड्डे झाकले जात असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठी कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती व पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने किरकोळ पावसातही रस्त्यावर पाणी साचून वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत.
या दयनीय परिस्थितीचा फटका व्यापारी, विद्यार्थी, रुग्णवाहिका सेवा तसेच दैनंदिन प्रवाशांना बसत आहे. वाढत्या गैरसोयीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून संबंधित कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने खड्डे बुजवून पाण्याचा निचरा करण्याची प्रभावी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
पावसाळा अद्याप सुरू असल्याने त्वरित उपाययोजना न झाल्यास गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देत सुरक्षित व सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews













