ऑनलाईन गुंतवणुकीचा मोह महागात ; कर सल्लागार, व्यापाऱ्याला ६५ लाखांचा गंडा

45

ऑनलाईन गुंतवणुकीचा मोह महागात ; कर सल्लागार, व्यापाऱ्याला ६५ लाखांचा गंडा
– व्हॉट्सॲप-टेलिग्रामच्या आमिषाला बळी; नफ्याचे स्वप्न दाखवून सायबर भामट्यांची लाखोंची लूट
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : सोशल मीडियावर शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी गडचिरोलीतील एका कर सल्लागारासह एका व्यापाऱ्याची तब्बल ६५ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सॲप व टेलिग्रामच्या माध्यमातून विश्वास संपादन करत दोघांकडून लाखो रुपये उकळण्यात आले. अखेर गुंतवलेली रक्कम आणि नफ्याचे पैसे मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक उघड झाली. याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
माडेतुकुम (ता. गडचिरोली) येथील ४१ वर्षीय कर सल्लागार रुपेश पुंडलिक भुरसे यांना ऑक्टोबर २०२५ मध्ये एका व्हॉट्सॲप ग्रुपवरून ‘मोहन पाटील’ नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. ‘टोटॅम-इन’ या ॲपच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगून सुरुवातीला काही परतावा दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर कस्तुरी स्टील कंपनीतील गुंतवणुकीच्या नावाखाली ५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्याकडून २१ लाख रुपये उकळण्यात आले. मात्र, नफा आणि मूळ रक्कम दोन्ही मिळत नसल्याने आपण सायबर फसवणुकीचे बळी ठरल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दुसऱ्या घटनेत, रामपुरी वॉर्डातील ५६ वर्षीय व्यापारी दत्तू बाबूराव कळमकर यांना ‘अनया अग्रवाल’ नावाच्या महिलेने टेलिग्रामवरून संपर्क साधून ‘अल्ट्रापेक्स.प्रो’ (Ultrapex.pro) या गुंतवणूक ॲपमध्ये पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले. ४ मार्च ते ७ मे २०२६ या कालावधीत त्यांनी टप्प्याटप्प्याने ४४ लाख रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले. ॲपमध्ये तब्बल ६० लाख रुपयांचा नफा दिसत असला, तरी पैसे काढण्याचा प्रयत्न करताच त्यांचे खाते ब्लॉक करण्यात आले. त्यानंतर खाते पुन्हा सुरू करण्यासाठी २० टक्के दंड भरण्याची मागणी करून आणखी फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला.
या दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्ती, व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुपवरून मिळणाऱ्या गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नये. कोणत्याही ॲप किंवा कंपनीत पैसे गुंतविण्यापूर्वी त्याची अधिकृतता पडताळून पाहावी आणि संशयास्पद व्यवहार तातडीने सायबर पोलिसांकडे नोंदवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #Gadchiroli #CyberCrime #CyberFraud #OnlineScam #ShareMarketScam #InvestmentFraud #CyberAwareness #WhatsAppScam #TelegramScam #OnlineInvestment #FinancialFraud #ScamAlert #MaharashtraNews #CrimeNews #TheGadVishwa

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here